राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक संपन्न                                           

            मुंबई, दि. 21 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपीलीय समितीची Media Certification and Monitoring Committees-MCMC). [Appellate Committee] आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य एस चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

            मंत्रालयात झालेल्या  राज्यस्तरीय अपिलीय  समितीच्या आढावा बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य. यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (MCMC) गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यस्तरावर सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली  माध्यम प्रमाणिकरण समिती (State Level Certification Committee) स्थापन करण्यात आलेली आहे. या दोन्ही समित्यांनी दिलेल्या निर्णयांविरुध्दचे अपील तसेच पेड न्यूज संदर्भात दाखल झालेल्या प्रकरणांवर निर्णय देण्यासाठी राज्यस्तरावर एस चोक्कलिंगम (भाप्रसे), प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती Media Certifiaction and Monitoring Committees-MCMC). [Appellate Committee] गठीत करण्यात आलेली आहे.

            सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष व उमेदवार निवडणूक प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर करीत असतात. यामध्ये मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे, जाहिरात फलक तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांचा समावेश असतो. या सर्व माध्यमांचा वापर तसेच त्यासाठी येणाऱ्या खर्चावर सनियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. नामनिर्देशनापासून ते मतदानाच्या दिनांकापर्यंत उमेदवाराकडून वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रचार साहित्यावर निवडणूक आयोगाची नजर असणार असून कुठल्याही मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यासंदर्भातील काम तसेच विनाप्रमाणीकरण प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, पेडन्यूज याबाबत समितीचे नियंत्रण व देखरेख असणार आहे.

            केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने विविध निर्देश दिले आहेत. आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईल, कुठल्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून आचारसंहिता काळात केले जाणार नाही, यासाठीचे नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची आहे.

            केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे राज्यस्तरीय एमसीएमसी अपिलीय समितीच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करुन श्री.चोक्कलिंगम यांनी समितीच्या कार्यकक्षेतील सर्व बाबीची कार्यवाही तत्पर आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *