मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दापोली व मंडणगड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

रत्नागिरी, दि. ९ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांचे श्रेणीवर्धन करणे, श्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हॅब्रीड अन्युटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे आज भुमिपूजन करण्यात आले.

यावेळी  पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, माजी मंत्री रामदास कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते.

काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन करण्यात आले.

दापोली येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी २० कोटी २१ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. याही कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

हायब्रीड अन्युटी (एमआरआयपी) अंतर्गत खेड व दापोली तालुक्यातील दापोली वाकवली साखरोली खेड भरणे रस्ता सुधारणा करण्याच्या कामास १३८ कोटी ६ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा शुभारंभही कोनशिलेचे उद्घाटन करुन करण्यात आले.

हर्णे मच्छीबंदराचा विकास करणे कामाचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

दापोली तालुक्यातील हर्णे येथील मच्छी बंदराचा २०५.२५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, बाबाजी जाधव उपस्थित होते. या बंदरामुळे स्थानिक ५५० व बाहेरील ८०० नौका लावता येणार आहेत. दापोली तालुक्यातील २३ मच्छीमार संस्थांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर आमदार योगेश कदम, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *