पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महोत्सव २०२४ – ‘उत्सव स्त्री शक्तीचा’

            मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कला महोत्सव 2024- ‘उत्सव स्त्री शक्तीचा’ या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, 8 मार्च ते रविवार, 10 मार्च, 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज  संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत  विविध चर्चासत्र, मुलाखती, नृत्य, गाण्याचे कार्यक्रम, नाटक सादर केले जातील.

            महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 8 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी घेतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीत शेतक-यांच्या विषयांवर भाष्य करणारे विनोदी लोकनाट्य ‘दादला नको  गं बाई’ याचे सादरीकरण सम्यक कलांश  प्रतिष्ठानचे कलाकार सादर करतील.

            9 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन, नागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार ‘तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान  प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचल, वित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले घेतील. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही होईल, या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित करतील.

            10 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित ‘सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावे, अभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा ‘देवी – दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन  डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.

            अमर हिंद मंडळ, दादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *