‘लेक लाडकी’ योजनेसाठी १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ४  मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत ३६ जिल्हयांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरित करण्यांत आले याबाबत  जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यांत येत आहे.

आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील १५ दिवसांत तालुका निहाय / जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यांत येत असून पात्र लाभार्थीनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्‍या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *