७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व २५ ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव दि. 2 (जिमाका) – रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा, आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून  जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त 77 आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयामध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी  अल्पबचत भवन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून 2023- 24 या आर्थिक वर्षात मंजुर करण्यात आलेल्या  नाविण्य पुर्ण योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालय जळगांव अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 आरोग्य संस्था व जिल्हा आरोग्य अधिकारी जळगांव यांचे अधिनस्त 77 आरोग्य संस्थांमध्ये ऑपरेशन थिएटर, रक्त साठवण केंद्र व रुग्णालय बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक 27 यंत्र खरेदी करण्यात आले आहेत. ते प्रत्येक यंत्राची पाहणी करून त्याची उपयोगिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणून घेतली. अगदी शेवटच्या घटकाला ज्या उपरुग्णालयातून, ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य सुविधा मिळते तिथे साधनाची कमतरता पडू नये म्हणून हे बळकटीकरण केले असल्याचे सांगून गरजू रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  सांगितले.

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत नव्या आठ रुग्णवाहिकांची भर

ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजनच्या निधीमधून बोदवड, न्हावी, अमळगाव , पिंपळगाव हरेश्वर , मेहुणबारे, भडगाव व समया रुगणालय  येथे नव्या आठ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. त्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अल्पबचत भवनच्या समोरील मैदानावरून हिरवी झेंडी दाखवून ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्यात  आल्या.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *