प्रधानमंत्री उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

• पंतप्रधान गगनयानच्या प्रगतीचाही घेणार आढावा
• पंतप्रधान महाराष्ट्रात 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण
• पंतप्रधान पीएम -किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता ; आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत सुमारे 3800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता करणार जारी
• पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार
• संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा पंतप्रधान करणार प्रारंभ
• मोदी आवास घरकुल योजनेचा पंतप्रधान करणार प्रारंभ
नवी दिल्‍ली, दि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.
28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता, पंतप्रधान महाराष्ट्रात यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि यवतमाळ येथे 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. कार्यक्रमादरम्यान ते पीएम किसान आणि इतर योजनांतर्गत दिले  जाणारे लाभ  जारी करतील.
पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा
यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत, 16 व्या हप्त्याची रु. 21,000 कोटींहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणा द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यातून शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतीत होत आहे.  याबरोबरच 3 लाख कोटींहून अधिक रक्कम, 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्याचा टप्पा पार होईल.
पंतप्रधान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे 3800 कोटी रुपयांचा 2रा आणि 3रा हप्ता देखील वितरित करतील, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल. ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये अतिरिक्त रक्कम प्रदान करते.
पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना (SHGs) रु. 825 कोटी इतका  फिरता निधी वितरित करतील. ही रक्कम भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना (NRLM) अंतर्गत प्रदान केलेल्या रकमे व्यतिरिक्त आहे.हा निधी बचत गटा अंतर्गत फिरत्या तत्त्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाते, जेणे करून ग्रामीण पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, आणि गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढेल.
पंतप्रधान महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील. सरकारच्या कल्याणकारी योजना कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवून, 100 टक्के पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाउल आहे.
पंतप्रधान महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करतील. आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे. पंतप्रधान, या योजनेच्या 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करतील.
पंतप्रधान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करतील. हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) आणि बळीराजा जल संजीवनी योजने (BJSY) अंतर्गत 2750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत.
पंतप्रधान महाराष्ट्रातील  1300 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करतील. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्ग  प्रकल्पाचा भाग) आणि नवीन आष्टी – अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग), या प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ब्रॉडगेज मार्गांमुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागांचे दळणवळण सुधारेल आणि इथल्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दोन रेल्वे सेवांना दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये कळंब आणि वर्धा यांना जोडणारी रेल्वे सेवा आणि अमळनेर आणि नवीन आष्टीला जोडणाऱ्या रेल्वे सेवेचा समावेश आहे. या नवीन रेल्वे सेवांमुळे या भागातील रेल्वेचे दळणवळण सुधारेल आणि विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवाशांना त्याचा लाभ मिळेल.
पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग -930 च्या वरोरा-वणी विभागाचे चौपदरीकरण, आणि साकोली-भंडारा आणि सालईखुर्द-तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे दळणवळण सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. पंतप्रधान यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील.
* * *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *