नंदुरबार,दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ (जिमाका वृत्त) :- नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे भूमीपूजन आज ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
शहरातील टोकरतलाव रोड येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेत सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यपाल रमेश बैस यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील, तर तर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, वैद्यकीय शिक्षण व आयुष चे आयुक्त राजीव निवतकर, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महमुनी, अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानांचेही भूमीपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.
दृष्टिक्षेपात वैद्यकीय महाविद्यालय
या नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकुण मंजूर खर्च ( केंद्र प्रयोजित वैद्यकीय महाविद्यालय – Phase III) 325 कोटी रुपये आहे. त्यापैकी 195 कोटी (60%) केंद्र सरकारचा वाटा आहे आणि 130 कोटी (40%) राज्य सरकारचा वाटा आहे.
500 खाटा आणि 100 एम.बी.बी.एस. प्रवेश क्षमतेच्या या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाची एकूण प्रशासकीय मान्यता47 कोटी रुपये ऐवढी आहे.
नवीन इमारतीची 46 एकर जागा मौजा टोकरतलाव, नंदुरबार येथे प्रस्तावित केली आहे.
500 खाटांच्या क्षमतेसह, या रूग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग,अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा , रक्तपेढी ,एक्स-रे, सोनोग्राफी , सीटी स्कॅन, डायलिसिस, मोठ्या आणि लहान शस्त्रक्रियांसाठी ऑपरेशन थिएटर या सारख्या विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
MBBS च्या पहिल्या बॅचची सुरुवात 2020 मध्ये झाली.
महाविद्यालयाची प्रवेश क्षमता प्रति वर्ष 100 MBBS विद्यार्थी असुन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या 4 बॅचेस (400 विद्यार्थी ) शिकत आहेत.
पहिली बॅच अंतीम MBBS पास होऊन मे 2025 पासून त्यांची इंटर्नशिप सुरू होईल.
राज्य वैद्यकीय विद्यापीठात आजपर्यंत MBBS चा सरासरी उत्तीर्ण दर सुमारे 92 टक्के आहे.
DNB पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 5 प्रमुख विषयांमध्ये या महाविद्यालयाचे मूल्यांकन पूर्ण झाले असुन लवकर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होतील.
000