पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे उद्घाटन

सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 36 जिल्ह्यात महासंस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी स्थानिक जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिलेला आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी या व्यासपीठावरून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करावे. तर सोलापूर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवास व स्थानिक कलाकारांना भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण,  संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

           सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून सिटी एक्जीबिशन हॉल येथे आयोजित महासंस्कृती महोत्सव 2024 च्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की संपूर्ण राज्यात महासंस्कृतिक महोत्सवास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच स्थानिक व ग्रामीण भागातील कलाकारांना यानिमित्ताने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. सोलापूर हे मोठे शहर आहे त्यामुळे येथे स्थानिक कलाकार उपलब्ध होतील, परंतु गडचिरोली, वासिम, चंद्रपूर व हिंगोली यासारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये स्थानिक कलाकारांची संख्या कमी असू शकते, त्या ठिकाणी  इतर जिल्ह्यातील कलाकार जाऊन आपली कला सादर करू शकतात. या महोत्सवातून राज्य शासन हे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देत आहे असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मान्यवर यांनी दीप प्रज्वलन करून महासंस्कृती महोत्सव 2024 चा शुभारंभ केला. या महोत्सव अंतर्गत दिनांक 21 फेब्रुवारी पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. आज सोलापूर येथील 150 स्थानिक कलाकारांचा जय जय महाराष्ट्र हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी राज्यातील विविध भागातील संस्कृतीची झलक आपल्या नृत्य व गायनातून दाखवली. श्री गणेशाच्या आराधनेतून सुरू झालेल्या कार्यक्रमात पिंगळा महागाई आली, वासुदेवाची स्वारी दारी आली, पावसाची गाणी, गोम संगतीन, जय जवान जय किसान, कोळी नृत्य, वाघ्या मुरळी नृत्य असे एकापेक्षा एक सरस नृत्य व गाणी कलाकारांनी सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

शनिवार व रविवार चे कार्यक्रम –

शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत वंदे मातरम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुढी  महाराष्ट्राची हा सांस्कृतिक कार्यक्रम सिटी एक्जीबिशन हॉल विष्णू मिल कंपाऊंड सोलापूर येथे होणार आहे.

त्याप्रमाणेच या ठिकाणी चित्र शिल्प दालन, महिला बचत गटांचे स्टॉल, वस्त्र दालन, शस्त्र प्रदर्शन स्टॉल लावण्यात आलेले आहेत. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *