विधानसभा कामकाज

मुंबईच्या विकासासाठी व मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी देणार – मंत्री डॉ. उदय सामंत

नगरविकास विभागाच्या अनुदानाच्या चर्चेला उत्तर

मुंबई, दि. १३ : मुंबईच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिला जाईल. मुंबईकरांना मूलभूत सुविधांबाबत कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील नगर विकास विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले, की मुंबईच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्याबाबत शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण कामाचे दोन्ही टप्पे मिळून सुमारे ७४ ते ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिकेला योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एखादा रस्ता अपूर्ण अवस्थेत असेल किंवा कामात विलंब होत असल्यास ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिल्या जातील. जनतेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ज्या रुग्णालयांमध्ये जागेची कमतरता आहे तेथे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर अधिक खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री डॉ. सामंत सांगितले.

नवीन झोपडपट्ट्यांना मान्यता देण्याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करताना मंत्री सामंत म्हणाले, की कोणतीही घोषणा थेट करण्याऐवजी त्यासाठी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. पुनर्वसनाची योजना ठरवूनच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.

०००

नंदकुमार वाघमारे /वि.सं.अ

 

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संख्येत ८०० पर्यंत वाढ – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि.१३ :  राज्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पूर्वी वर्षभरात ३००300 ते ४०० सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असत, मात्र आता राज्यभरात जवळपास ८०० सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला त्यांनी उत्तर दिले.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात करवंड येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाहाला 370 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने करवंड महोत्सव 2026 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका नाट्यस्पर्धा सुरू करण्यात आली असून राज्य नाट्यस्पर्धेचे सात प्रकार राबवले जात आहेत. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘महावारसा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कारही सुरू करण्यात आला असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत’ या गीताला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताच्या 150 वर्षांनिमित्त राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर झालेल्या महाराष्ट्राच्या गणेशोत्सवावरील चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक मिळाला असल्याचा उल्लेख करत गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर राज्यात तसेच मॉरिशससारख्या देशांतही मराठी संस्कृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची संख्या 12 वरून 50 पर्यंत वाढवण्यात आली असून त्यातील रकमेचीही वाढ करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या 750 व्या जन्मजयंतीनिमित्त देश-विदेशातील विद्यापीठांमध्ये त्यांच्या विचारांचा प्रसार करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुराभिलेख संचालनालयामार्फत 2 कोटी 88 लाख ऐतिहासिक कागदपत्रांचे सूक्ष्मचित्रीकरण करण्यात आले आहे. मोडी लिपीवरील कार्यशाळा देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईतील बीकेसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाराष्ट्र राज्याचे एकत्रित वस्तुसंग्रहालय उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमधील लिलावातून परत आणण्यात राज्याला यश आले. युनेस्कोच्या यादीत राज्यातील 12 गड-किल्ल्यांचा समावेश झाल्यानंतर त्यांच्या संवर्धनासाठी विशेष कामे सुरू आहेत. कोकणातील सुमारे 20 हजार वर्षे प्राचीन मानल्या जाणाऱ्या कातळ शिल्पांच्या संशोधनासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय महात्मा गांधी यांच्या 1931 ते 1948 या काळातील पत्रव्यवहार व लेखनाचा समावेश असलेले सुमारे 24 हजार पृष्ठांचे संकलित वाङ्मय प्रकाशित करण्याचे कामही विभागाने केले आहे. रवींद्र नाट्य मंदिर येथे स्थापन करण्यात आलेल्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून एका वर्षात सुमारे एक हजार कार्यक्रम, 25 हजार कलाकारांचा सहभाग आणि 10 लाख प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच मराठी चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून एफटीआयआय, पुणे यांच्यासोबत करार करून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

००००

ब्रिजकिशोर झंवर / वि.सं.

 

सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १३ : सामाजिक न्याय विभागातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.  आवश्यकतेनुसार काही पदांवर आउटसोर्सिंगच्या माध्यमातूनही कामकाज सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री देसाई म्हणाले, पैठण येथे वसतिगृह तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी नवीन वसतिगृह आणि शाळा मंजूर करण्याबाबत ऊसतोड कामगारांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र मंडळामार्फत पाठपुरावा करण्यात येईल. पैठण येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध असल्यास आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व बाबींसह परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल. विभागाकडे प्राप्त झालेला निधी नियोजित कालावधीत खर्च करण्यात आला असून निधी वितरित होऊनही खर्च न झाल्याची स्थिती नाही. तथापि, आवश्यक प्रशासकीय सुधारणा करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

ब्रिजकिशोर झंवर / वि.सं.

 

पैठण पर्यटन विकासाला गती; संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी आठ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १३ : पैठण येथे पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत पर्यटन विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, आपेगाव आणि संत एकनाथ महाराज समाधी परिसरात ‘संत सृष्टी’ उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. अधिवेशनानंतर केंद्रीय पर्यटन मंत्र्यांसोबत चर्चा करून या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमार्फतही केंद्राकडे यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल. तीर्थक्षेत्र विकास योजना प्रामुख्याने ग्रामीण विकास विभागामार्फत राबवली जाते. मात्र अन्य ठिकाणी पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केल्यास पर्यटन विभागाकडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित उपस्थित झालेल्या काही मुद्यांवर बोलताना पात्रतेसाठी वीज बिलाचा पुरावा ग्राह्य धरला जातो; मात्र बनावट वीज बिलांच्या तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

ब्रिजकिशोर झंवर / वि.सं.

 

अर्थसंकल्पातील पाच विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर

मुंबई, दि. १२ : अर्थसंकल्पातील नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, गृहनिर्माण, पर्यटन व सांस्कृतिक कार्य आणि इतर मागास बहुजन कल्याण या विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होऊन विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उत्तरे दिली.

सदस्यांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सांगितले.

000

नंदकुमार वाघमारे /वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *