महाराष्ट्र–कॅनडा दरम्यान कृषी तंत्रज्ञान, एआय व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याला गती देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कृषी शिक्षण, कृषी अन्नप्रक्रिया उद्योग आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी व कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य अधिक बळकट झाल्यास गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

कॅनडातील उद्योग व संशोधन क्षेत्रातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यात कृषी, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच ग्रामीण विकास क्षेत्रातील संभाव्य सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. कृषी तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य विकास तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींचा प्राथमिक आढावा यावेळी घेण्यात आला.

RAVI JADHAV

बैठकीस कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, उपसचिव श्रीकांत आंडगे, अवर सचिव ललितकुमार धायगुडे तसेच पोक्रा प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह तसेच महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदचे सदस्य विनायक काशीद, इंडो-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रशांत श्रीवास्तव, उपाध्यक्ष आलोक नागपाल, संदीप मामजीन, करमवीर राठी, विकास गुप्ता तसेच कॅनडातील उद्योग व संशोधन क्षेत्रातील इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

हवामान हा शेती क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग तसेच आर्द्रता या घटकांवर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालींच्या वापरामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज घेणे तसेच उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणे शक्य होत आहे.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आणि कॅनडातील विद्यापीठांदरम्यान संशोधन सहकार्य वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही देशांतील विद्यापीठांमध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान देवाणघेवाण तसेच विद्यार्थ्यांसाठी आंतरविद्यापीठ स्तरावर दुहेरी पदवी कार्यक्रम आणि विविध शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक सहकार्य वाढविण्याच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, संशोधन अनुभव आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकते, असेही कृषीमंत्री भरणे म्हणाले.

RAVI JADHAV

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेती अधिक वैज्ञानिक, अचूक आणि नफ्याची बनत आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता तसेच बाजारातील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यात कृषी तंत्रज्ञान, संशोधन व गुंतवणूक या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याबाबतही माहिती यावेळी देण्यात आली.

शिक्षण व कौशल्य विकास, कृषी तंत्रज्ञान संशोधन, अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळी व्यवस्थापन तसेच शाश्वत कृषी पद्धती यांसंदर्भात तांत्रिक व ज्ञानाधारित सहकार्याच्या शक्यतां तसेच तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप, नवकल्पना परिसंस्था आणि कृषी संशोधन सहकार्याला चालना देण्यासाठी संभाव्य सहकार्याच्या संधींचाही आढावा यावेळी घेण्यात आला. अन्नपोषण, सार्वजनिक आरोग्य तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात सहकार्य करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आला.

कृषी, तंत्रज्ञान, संशोधन आणि ग्रामीण विकास क्षेत्रात महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यातील सहकार्याला भविष्यात नवी दिशा मिळेल, असा विश्वास कृषीमंत्री श्री. भरणे यांनी व्यक्त केला.

0000

अश्विनी पुजारी/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *