महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे – अध्यक्ष डॉ. एस. पी. कत्याल

मुंबई, दि. २२:- राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम–२०१३ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, शालेय पोषण आहार योजना व राष्ट्रीय एकात्मिक बाल विकास सेवा योजना या तिन्ही महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी  प्रभावी व समाधानकारक असल्याचे मत हिमाचल प्रदेशच्या राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष एस. पी. कत्याल यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीस अध्यक्ष कत्याल उपस्थित होते. बैठकीत राज्य अन्न आयोग मुंबईचे सह सचिव तथा सदस्य सचिव आत्राम, सचिव प. फ. गांगवे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील पुरवठा, शिक्षण तसेच महिला व बाल विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष कत्याल यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्य, पोषण आहार व बालकल्याण सेवांची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत विभागनिहाय सूचना केल्या.

बैठकीनंतर अध्यक्ष कत्याल यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ठाणे येथील एका रास्त भाव दुकानास भेट देऊन प्रत्यक्ष वितरण प्रक्रियेची पाहणी केली. तसेच एका अंगणवाडीला भेट देऊन बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. याशिवाय इस्कॉन संस्थेमार्फत ‘अक्षयपात्र’ योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय स्वयंपाकघरास भेट देऊन शाळांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली.

बैठक व क्षेत्रीय पाहणीअंती अध्यक्ष एस. पी. कत्याल यांनी राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम–२०१३ अंतर्गत सर्व योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जात असल्याबाबत समाधान व्यक्त करत संबंधित यंत्रणांचे कौतुक केले.

0000

वंदना थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *