‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त’ ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’मध्ये विशेष मुलाखतींचे प्रसारण

मुंबई, दि. ६ : महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमध्ये राज्यातील कर्तृत्ववान महिला मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या विशेष मुलाखतींचे प्रसारण केले जाणार आहे. समाजपरिवर्तनाला दिशा देणाऱ्या आणि संवेदनशीलतेने राज्य कारभार सांभाळणाऱ्या या मुलाखतीतून जिद्द, आत्मविश्वास आणि समर्पणाचा प्रेरणादायी संदेश उमटतो.

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील या विशेष संवादात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांना शुभेच्छा देताना सांगितले की, महिला ही केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची आधारस्तंभ आहे. आजच्या काळात महिला विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असून अनेक आव्हानांना सामोरे जात स्वतः सक्षम होत आहेत आणि समाजालाही प्रेरणा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिजाऊ माता, लोककल्याणकारी कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी होळकर, तसेच महिला शिक्षणाची क्रांती घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा समृद्ध वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. मात्र हा सन्मान केवळ माझा नसून राज्यातील सर्व महिलांचा आहे, असे सांगत महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, तसेच नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत विशेष मुलाखतीतून आपल्या कार्यप्रवासातील अनुभव, आव्हाने, धोरणात्मक दृष्टीकोन आणि महिलांच्या सबलीकरणाबाबतच्या भूमिका मनमोकळेपणाने मांडल्या आहेत. त्यांच्या अनुभवकथांमधून नेतृत्वातील संवेदनशीलता आणि दृढनिश्चयाची छटा दिसून येते.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील या विशेष संवादाचे प्रसारण रविवार, 8 मार्च 2026 रोजी महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर होणार आहे. तसेच मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर या मुलाखतींचे प्रसारण होईल. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात हा विशेष संवाद 9 ते 14 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतींचे सूत्रसंचालन निवेदक सुषमा जाधव यांनी केले आहे.

अधिकृत समाजमाध्यम दुवे :

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *