अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत’ केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. 01 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध विकासामुळे आज भारताची अर्थव्यवस्था जगासाठी एक आशेचा किरण ठरली आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो देशातील गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कामगारांचे जीवनमान उंचावणारा ठरणारा आहे, अशी भावना राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

कामगार  मंत्री श्री फुंडकर म्हणाले, राज्यातील पायाभूत सोयी सुविधांसाठी अर्थसंकल्पात दिलेल्या भरीव निधीमुळे राज्यातील ‘ इन्फ्रास्ट्रक्चर’ जागतिक स्तराचे होण्यास मदत मिळणार आहे. देशांतर्गत उत्पादनावर दिलेला भर आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी केलेली १० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद ही देशातील औद्योगिक क्रांतीला नवी दिशा देणारी आहे. वस्त्रोद्योग क्लस्टरच्या विकासामुळे आणि खनिज कॉरिडॉरमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, ज्याचा सर्वाधिक फायदा तरुण कामगार वर्गाला होईल.

सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सरकारने कॅन्सर आणि मधुमेहाची औषधे स्वस्त करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दिलासादायक आहे. तसेच, बायोफार्मा उत्पादनासाठी १० हजार कोटींची तरतूद करून भारताला या क्षेत्राचे जागतिक ‘हब’ बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामुळे आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि परवडणाऱ्या होतील, असेही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी नमूद केले आहे.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या खादी आणि हातमाग क्षेत्रासाठी ‘महात्मा गांधी ग्रामस्वराज’ अभियान ही क्रांती आहे. हातमाग उत्पादनात वाढ झाल्यामुळे ग्रामीण कारागिरांच्या कौशल्याला जागतिक बाजारपेठ मिळेल आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर दिलेला भर आणि ४ राज्यांमध्ये प्रस्तावित असलेले खनिज कॉरिडॉर हे भारताच्या सर्वांगीण विकासाचे निदर्शक आहेत. आर्थिक विकास दरात सातत्याने वाढ करणे हे आमचे पहिले कर्तव्य असून सरकार त्या दृष्टीने ठोस पावले उचलत आहे, असेही मंत्री ॲड फुंडकर म्हणाले.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *