महाराष्ट्र वन विकास महामंडळाचा सुवर्ण महोत्सव

महाराष्ट्र वन विकास महामंळाची स्थापना १६ फेब्रुवारी १९७४ रोजी राज्य शासनाची पूर्ण मालकी असलेली शासनाची उपकंपनी म्हणून करण्यात आली. समान ध्येय आणि उद्दिष्टे असलेले वन विकास मंडळ १९६९ पासून अस्तित्वात होते. याचे रूपांतर महाराष्ट्र वन विकास महामंडळामध्ये झाले. या महामंडळाला उद्या 50 वर्षे पूर्ण होत आहेत. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महामंडळाची माहिती तसेच कार्यकर्त्वाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…

सागरोपवन वाढविणे, त्याची कापणी, इमारत व इतर वनउपजांचे विपणन करण्याचा पाच दशकाहुन अधिक अनुभव असणारे वनीकरण क्षेत्रातील अग्रेसर महामंडळ अशी ओळख महाराष्ट्र वन विकास महामंडळाने जपली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन असलेले, नफा आणि सरकारला लाभांश देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड असलेले अशीही महामंडळाची वेगळी ओळख आहे. महामंडळामार्फत झालेल्या रोपवनाचे सध्याचे मुल्य ४ हजार कोटींपेक्षा जास्त असून ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये महामंडळ मोठया प्रमाणात योगदान देत आहे.

3 लाख 43 हजार हेक्टर कार्यक्षेत्र

महाराष्ट्र सरकारने ०३.४३ लाख हेक्टर जंगल महामंडळाला त्यांच्या उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. ते राज्याच्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ०६.०० टक्के इतके आहे. महामंडळाला भाड्याने दिलेले वनक्षेत्र हे ३ प्रदेशात विभागले असून त्याअंतर्गत १२ वन प्रकल्प विभाग, १ औषधी वनस्पती विभाग आणि बल्लारशाह येथे १ आगार विभाग कार्यरत आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमांवर भर

महामंडळ बाह्य संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर यशस्वीरीत्या रोपवणाची निर्मिती करीत आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, इंडियन एअर फोर्स, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यासारख्या अनेक संस्थांच्या जमिनीवर “टर्नकी रोपवन” करण्यात आली आहेत. अशाप्रकारे महामंडळ विविध सरकारी योजनांतर्गत आणि कॉर्पोरेट हरित उपक्रमांचा एक भाग म्हणून निकृष्ट वनजमिनीवर देखील वृक्षारोपण करते.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान

काही वर्षांपूर्वी, गोरेवाडा, नागपूर येथील जागतिक दर्जाच्या प्राणिसंग्रहालयाची रचना, बांधकाम आणि संचालन करण्याचे काम महाराष्ट्र सरकारने महामंडळकडे सोपवले होते. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान ही महामंडळाची निर्मिती आहे. वाघ, अस्वल यांसारखे वन्य प्राणी आणि तृणभक्षी प्राण्यांच्या विविध प्रजाती त्यांच्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात दाखवून हे उद्यान नागपुरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून बहरले आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पामध्ये आफ्रिकन सफारी, वॉक-इन एव्हियरी, ट्रायबल ट्रेल आणि वॉकिंग ट्रेल यासारखी अनेक आकर्षणे जोडली जाणार आहेत.

वनोपज उत्पादन व विक्रीत सुसुत्रता

 महामंडळ दरवर्षी सुमारे ५० हजार घनमीटर इमारती लाकूड निर्मिती ‍करते. त्याची विक्री लिलावाद्वारे केली जाते. ग्राहकांना स्पर्धात्मक किमतीत दर्जेदार लाकडाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, महामंडळने नुकतेच चिराण लाकडाचे उत्पादन आणि विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे स्थापित सरकारी आरागिरणीचे रूपांतर करून एक उत्पादन युनिट स्थापन करण्यात आले आहे. भविष्यात अश्या आणखी उत्पादन युनिट्ससह महामंडळ सर्वोत्तम दर्जेदार चिराण लाकडाचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून भारतीय लाकूड बाजारपेठेत मोठा प्रभाव पाडण्यासाठी तयार आहे.

इतर उपक्रमासह बांबूचे मूल्यवर्धन

 महामंडळाने पर्यावरण पर्यटन, औषधी वनस्पतींची लागवड, इमारत लाकूड आणि बांबूचे मूल्यवर्धन यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांमध्येही विविधता आणली आहे. इतर अनेक हरित उपक्रमही सुरू होत आहेत. महामंडळ च्या सामाजिक व्यवसायिक जबाबदारी (CSR) निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.

येत्या काळातही हे महामंडळ यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत, असे या महामंडळाच्या आजवरच्या वाटचालीवरून दिसून येते. ख-या अर्थाने हे महामंडळाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल ही ‘सुवर्ण’मय ठरली आहे.

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *