पुरस्कांरांमधून आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 15 : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांमुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे समाजामध्ये चांगले काम करण्याची प्रेरणा आणखी लोकांना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह उद्योगपती मुकेश अंबानी, लोकमत समूहाचे विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते जितेंद्र, रणबीर कपूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजामध्ये अनेक लोक विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असतात असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या लोकांना व त्यांची कामगिरी समाजासमोर आणण्याचे काम अशा पुरस्कारांच्या माध्यमातून लोकमत समूह करीत आहे. या पुरस्कारांमुळे समाजातील नवीन पिढीला समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहते.  लोकमत समूहाचे काम फक्त बातम्या देण्याइतके मर्यादित नसून अनेक समाजोपयोगी कामे या समूहामार्फत केली जातात. राज्यातील गुणवंतांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा लोकमत समूह जपत असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात विविध विकास कामे सुरु आहेत. तसेच अनेक विकास प्रकल्प शासनाने पूर्ण केले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा विकास वेगाने सुरू आहे. 22 किलोमीटर लांबीच्या अटल सेतुमुळे रायगड – मुंबई अवघ्या 15 मिनिटांत पोहोचता येते. समृद्धी महामार्गामुळे नागपूर – मुंबई प्रवास 7 तासांचा झाला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने असे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. थेट परकीय गुंतवणुकीमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेचाही प्रथम पुरस्कार राज्याला मिळाला आहे. हे सर्व राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री उत्कृष्ट काम करत असल्यामुळेच शक्य झाले आहे. तसेच राज्याचे अधिकारीही लोककल्याणासाठी उत्कृष्ट काम करत आहेत. राज्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या या लोकांना लोकमत समूहाने आज पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याबद्दल मी लोकमत समूहाचे अभिनंदन करतो असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *