कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस – पालकमंत्री हसन मुश्रीफ

 कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : कृषी, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात चांगली प्रगती करीत असलेला कोल्हापूर जिल्हा येत्या काळात विविध विकास कामांतून देशात अग्रस्थानी नेण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू स्टेडियम येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच तंबाखू मुक्तीची व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना दिली. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे,  तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारस, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच एकत्रित सर्व सुविधांचा अंदाजे 1 हजार कोटी रुपयांचा श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्याच्या अंमलबजावणीनंतर अनेक वर्षांचे आपले स्वप्न पूर्ण होईल. मंदिर परिसरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पर्यटक व भाविकांच्या संख्येत किमान 10 पटीने वाढ होईल. पुरातत्व विभागाकडे असलेल्या श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ला या महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांच्या संवर्धनासाठी 950 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व असून  या महोत्सवाला जगभरात पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत आणि देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सर्वांच्या मनात रुजवावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीपणे घेण्यात आली. यात साडे नऊ लाखांपेक्षा जास्त व्यक्तींना आयुषमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले.  तसेच, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर 4 हजार 870 कारागीरांची व शहर स्तरावर 2 हजार 298 कारागीरांची नोंदणी झाली आहे. अशा एकुण 7 हजार 168 कारागिरांच्या प्रस्तावांपैकी 2 हजार 842 अर्ज पडताळणी होऊन जिल्हा स्तरावर प्राप्त आहेत. हे सर्व अर्ज तपासून राज्यस्तरावर पाठविण्यात आले असून यापैकी राज्यस्तरीय समितीद्वारे 1136 कारागीरांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.

अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षामध्ये देखील 117 कोटी रुपये मंजूर असून विविध विभागांना त्याचे वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 54.40 कोटी रकमेची एकूण 339  विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.

श्री जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा 1600 कोटींचा तयार करण्यात आला असून त्याचेही  सादरीकरणही लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी करण्यात येणार आहे.  अंदाजे 300 कोटी रुपयांच्या कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरसाठी सुध्दा मोठा पाठपुरावा करण्यात येत आहे.  कोल्हापूर येथील आय.टी. पार्कसाठीची शेंडा पार्क येथील 32 हेक्टर जागा सुध्दा लवकरच एम.आय.डी.सी.कडे हस्तांतरीत होणार आहे. तसेच बिंदू चौक कारागृह स्थलांतराबाबतची कार्यवाही मंत्रालय स्तरावर सुरु असून  प्री एनडीए ॲकॅडमी बनविण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झाली असून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णपणे ई-ऑफीस कार्यप्रणालीचा वापर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिकरित्या विपुल साधनसंपदेने नटलेला आहे. ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक, वन, कृषी, साहसी, क्रीडा पर्यटन स्थळे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी येथील पर्यटन स्थळांचा विकास अभूतपूर्व प्रमाणात करण्यात येत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त करुन कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण व अनेक राज्यांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरु झाल्यानंतर जिल्ह्याच्या उद्योग, व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल.

विकासाच्या   दिशेने   वाटचाल   करणारा   कोल्हापूर   जिल्हा सर्वच क्षेत्रात  चांगली  प्रगती   करीत  असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी  शासनाकडून   सर्वतोपरी  सहकार्य   केले   जाईल,  अशी    ग्वाही  त्यांनी यावेळी दिली.  तसेच देशाची, राज्याची तसेच जिल्हयाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी मिळून एकत्रित काम करुया, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदाना प्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक वसंतराव  ज्ञानदेव माने, श्रीमती शांताबाई अभिमन्यू कदम, श्रीमती जयवंती आदगोंडा पाटील, श्रीमती शकुंतला बाबासाहेब घोडके, श्रीमती मालुताई महादेव पुरीबुवा, श्रीमती गीता रंगराव गुरव, श्रीमती छाया रंगराव भोसले, श्रीमती मंगला प्रभाकर वसगडेकर, श्रीमती वैजयंता चंद्रकांत नाईक – परुळेकर, श्रीमती शांताबाई भाऊसो तावडे,  श्रीमती शांता गणपत पाटील, श्रीमती सुलोचना विष्णुपंत सुर्यवंशी, श्रीमती नजमा इमाहुद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.

  यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महाराष्ट्र कामगार कल्याण कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आदी विभागांच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाल्याबद्दल करवीरचे उप विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी,  चार सर्वोच्च शिखरे सर करुन जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरुन.. दोन वर्ल्ड रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झाल्याबद्दल कु. अन्वी चेतन घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. एकत्रित आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्ट्यिूट लिमिटेड व आर.सी.एस.एम. शासकीय रुग्णालय आणि सी.पी.आर रुग्णालयांचा सत्कार करण्यात आला. आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचे ई कार्ड काढण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आरोग्य मित्र स्वप्नील पिंपळकर व सौरव वरुटे  व तेजस्विनी लाड व अक्षय पाटील यांचाही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस, माजी सैनिक, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाचा शेवट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *