हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):  नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त आयोजीत सोहळ्यास जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यामार्फत करावयाच्या पूर्वतयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला.

निवासी उपजिल्हाधिकारी  जनार्दन विधाते, उपायुक्त लखिचंद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ,अन्न निरीक्षक वर्षा रोडे, गुरुद्वारा संस्थांशी संबंधित नंदकुमार अहुजा, गुरुज्ञान सिद्ध रणवीरसिंह , नरेंद्रसिंग तारासिंग जबिंदा, हरिंदरसिंग, जगदेव सिंग, रमेश वधवा, राज्य समिती सदस्य उत्तम चव्हाण, डॉ. सुदाम चव्हाण, करतार राठोड, कुलदीपसिंग छाबडा,सरदार हरिसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येत्या २४ व २५ जानेवारी रोजी येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय एकत्र येणार आहेत. श्री गुरु तेग बहादुर यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी  https://gurutegbahadurshahidi.com  या संकेतस्थळावर रस्ते, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महानगरपालिका, शाळा-महाविद्यालये, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची नोंद घेणे. त्यांच्याशी समन्वय साधून नांदेड येथील वाहनतळ व अन्य अनुषंगिक व्यवस्थांबाबत त्यांना अवगत करणे. या आयोजनासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ति, संस्थांशी समन्वय साधणे, या आयोजनाबाबत तसेच या इतिहासाबाबत जनजागृती करणे यासंदर्भात नियोजन करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. या कार्यक्रमात सर्व समाजातील लोकांचा सहभाग घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक विद्यालये व महाविद्यालयांनी दैनंदिन उपक्रम राबवून जनजागृती करावी,असे आवाहनही त्यांनी केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *