डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विकास कामासाठी पुरेसा निधी देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

रायगड(जिमाका)दि.6:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतर्गत विकासासाठी आवश्यक असे प्रस्ताव तयार करावेत. या सर्व प्रस्तावांना शासनस्तरावरून मंजुरी देण्यात येईल. तसेच विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव-2023 च्या समारोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी विश्वनाथ काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांच्यासह क्रीडा विभागातील सर्व सह समन्वयक आणि  विविध समित्यांचे समन्वयक  उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, तंत्रशास्त्र विद्यापीठाचे महत्व खूप मोठे आहे.  पुढीलवर्षी विद्यापीठांतर्गत किमान 3 हजार विद्यार्थी जगातल्या वेगवेगळया देशात पाठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे 25 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा येथे घेण्यात आली याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. खेळामध्ये सर्वांनी एकमेकांना समजावून घेणे आवश्यक असते.  सर्व खेळाच्या मैदानासाठी आवश्यक असलेला निधी देण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केला जाईल.  मुलींच्या वसतिगृहासाठी तसेच खेळांच्या मैदानासाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे एक आदर्श विद्यापीठ व्हावे, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती जोपासावी व चालना देवून येथे राष्ट्रीय स्तरावरचे क्रीडांगण तयार करावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य व राष्ट्रीय स्तरीय खेळ येथे आयोजित करता येईल.

यावेळी क्रीडा संकुलातील फुटबॉल, खो-खो व कबड्डी मैदान, मुलींचे वसतिगृह, नूतनीकृत सभागृहाचे उद्घाटन तसेच कार्यशाळा इमारतीचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.

कुलगुरू डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, अभ्यासक्रम तसेच एकूण वाटचालीची माहिती दिली.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *