शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष कायदा  करण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. 25 डिसेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :  शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवर्कष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मंत्री ॲड. कोकाटे यांनी येथे दिले.

नाशिक विभाग पोलिस महानिरीक्षक कार्यालयात आज दुपारी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. कोकाटे म्हणाले की, शेतकरी हा पूर्णत: शेतात पिकणाऱ्या पिकांवर अवलंबून असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळेल त्या ठिकाणी तो शेतीमालाची विक्री करीत असतो. काही वेळेस फसवणुकीच्या घटना घडतात. यासाठी शेतकऱ्यांना जो व्यापारी माल घेणार आहे, त्या व्यापाऱ्याची माहिती असणे आवश्यक आहे. फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभागातर्फे मोहीम राबविण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणुकीपोटी झालेल्या ४६ कोटी रूपयांच्या वसुलीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्यात. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल. असेही मंत्री श्री. कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सांगितले.

विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. कराळे म्हणाले की, शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी पोलिस अधीक्षक यांची भेट घ्यावी. शेतमाल देताना व्यापाऱ्यांकडून सौदा पावती करून घ्यावी. जेणेकरून फसवणूक झाली, तर कायदेशीर करवाई करता येईल. तसेच व्यापाऱ्यांची पार्श्वभूमी समजावून घ्यावी. कृषी विभाग, द्राक्ष बागायतदार आणि पोलिसांतर्फे जनजागृती करण्यात येईल.

पोलिस अधीक्षक श्री. देशमाने यांनी सांगितले की, याबाबत तीन महिन्यांपासून कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन केले आहे. फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून आरोपी अटकेत आहे. पोलिस दल यंत्रणेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची पडताळणी करून देईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी माहिती पुरवावी. याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री. भोसले, श्री. शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी कृषीमंत्री ॲड. कोकोटे यांच्या हस्ते वर्ल्ड शूटिंग चॅम्पियन रूद्रांश पाटील याचा आंतरराष्टीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.
०००००

 

 

The post शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष कायदा  करण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *