आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु

पुणे दि.३-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत १० संवर्गातील पदांसाठी अंतरिम निवड व प्रतिक्षा याद्या आणि गुणवत्ता याद्या  २ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी २८ ऑगस्ट २०२३ रोजी मेगा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील एकूण १० हजार ९४९ पदांसाठी पात्र उमेदवारांची  ३० नोव्हेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती.  भरती प्रक्रियेतील आहारतज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृह नि वस्त्रपाल, ग्रंथपाल आदी पदांची अंतरिम निवड व प्रतिक्षा याद्या व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या १० संवर्गातील नियुक्ती ८ फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून, उर्वरीत संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादी ८ दिवसात लावण्यात येणार आहे. नियुक्त्यादेखील लवकरच करण्यात येणार आहेत.भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन तसे निर्देश दिले होते.

संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी टीसीएस संस्थेची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स ची व्यवस्थाही लावण्यात आलेली होती.

 

टीसीएसकडून निवड यादीतील उमेदवारांचे बायोमॅट्रीकद्वारे घेतलेल्या हाताच्या बोटांचे ठसे व फोटो कागदपत्रे पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडील प्रतिनिधींमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तेव्हा बायोमॅट्रीकद्वारे घेतलेले ठसे व प्रत्यक्ष उपस्थित उमेदवारांचे बोटांचे ठसे व फोटो आयडी याची अंतिम तपासणी करण्यात येणार आहेत.

पदभरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यात आले. या प्रक्रियेत विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व टिसीएस चे प्रतिनिधी यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

गेल्या पाच वर्षात प्रथमच एकूण १० हजार ९४९ पदांसाठी प्रक्रिया राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीनंतर मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *