राज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीची जोपासना, प्रतिभावंत खेळाडूंना संधी देण्यासाठी भरीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : असून, विविध माध्यमातून भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे भविष्यात महाराष्ट्रातून जास्तीत जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केला.

कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2023-24 च्या संयोजनाचा मान सांगली जिल्ह्याला मिळाला असून, स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे अध्यक्षस्थानी तर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सुधीर गाडगीळ स्वागताध्यक्ष होते. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, क्रीडा व युवक संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, सांगलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा, शेखर इनामदार, सुरेश पाटील, गजानन मगदूम आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या स्पर्धा मराठवाड्यात होणार होत्या. मात्र, सांगलीकरांच्या आग्रहास्तव स्पर्धा सांगलीमध्ये भरविण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या वतीने खो-खो, कबड्डीसह ४ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या चारही स्पर्धांच्या संयोजनाच्या निधीत भरीव वाढ केली आहे, असे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात बदल घडविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अनेक निर्णय घेण्यात आल्याचे सांगून उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तीन वर्षे प्रलंबित शिवछत्रपती राज्य पुरस्कारांचे वितरण करून पारितोषिक रकमेत वाढ करण्यात आली आहे. सन २०२२-२३ चा पुरस्कार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी म्हणजेच १९ फेब्रुवारीला वितरित करण्यात येत आहेत. याशिवाय आशियाई स्पर्धेतील खेळाडुंना व दिव्यांगांना पूर्वतयारीसाठी आर्थिक मदतीसह आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्यास एक कोटी रूपये, रौप्य पदक विजेत्यास ७५ लाख रूपये व कांस्य पदक विजेत्यास ५० लाख रूपये तसेच, सांघिक विजेत्यांनाही भरीव रकमेचे पारितोषिक देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. क्रीडा मार्गदर्शक व सहभागी खेळाडुंनाही पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

देशात क्रीडा संस्कृती वाढून ऑलिंपिक व जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी मिशन लक्ष्यवेध राबविण्यात येत आहे. त्यासाठी दर्जेदार क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निवडक खेळाडुंना अद्ययावत प्रशिक्षण, स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ, नमो क्रीडांगण विकास योजनेतून दर्जेदार क्रीडा सुविधा, क्रीडा विभागातील पारदर्शक पदभरती, पुणे येथे ऑलिंपिक भवन व आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सहभागी खेळाडुंना सरावासाठी मोठी आर्थिक मदत, तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलांच्या निधीत वाढ, व्यायामशाळा विकास योजना, खेलो इंडिया पॅरा आलिंपिक स्पर्धा, स्पोर्टस् सायन्स सेंटर, युवा महोत्सव, राज्य क्रीडा दिन अशा विविध माध्यमातून क्रीडा धोरण व्यापक केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील खेळाडुंना सोयी सुविधा पुरवण्यात कोणत्याही उणिवा ठेवू नयेत, असे सांगून उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्पर्धेच्या संयोजनाचा मान सांगलीला दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त करून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पाच राष्ट्रीय खेळाडूंचा उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण व मैदान पूजन करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रगीत वादन करण्यात आले. तसेच, क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. खेळाडुंना शपथ देण्यात आली. स्वागत माणिक पाटील यांनी केले. प्रास्ताविक चंद्रजीत जाधव यांनी केले. आभार किरण बोरवडेकर यांनी मानले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांची मान्यता असलेली ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, सांगली, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व्दारा शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुपवाड येथे दिनांक ०८ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटनावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये ६८० खेळाडू व १०० संघ व्यवस्थापक, सरपंच, पंच, संघटना प्रतिनिधी, सहभागी झाले आहेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, विदर्भ खो-खो असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा खो-खो असोसिएशन यांनी मान्यता दिलेले महिलांचे १२ संघ व पुरुषांचे १२ संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच एकूण किशोर ०८ संघ व किशोरी ०८ संघ सहभागी झाले आहेत.

स्पर्धेसाठी शासन निर्णयानुसार अनुदान रु. ७५ लाख इतके अनुदान प्राप्त होणार आहे. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आयोजन समिती गठित करण्यात आली असून, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्याध्यक्ष, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक हे कोशाध्यक्ष, संबंधित खेळाच्या राज्य संघटनेचे सचिव हे आयोजन समितीचे सचिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हे संयुक्त सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *