भारतीय साहित्य विश्व समृद्ध करणारे तत्वचिंतक, साहित्यिक

मुंबई, दि. २४ :- काळाच्या कसोटीवर टिकणाऱ्या अद्वितीय साहित्यकृतींची निर्मिती करून भारतीय साहित्यविश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य, तत्वचिंतनाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रख्यात कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, भैरप्पा यांनी आपल्या वैविध्यपूर्ण विषयांवरील कादंबऱ्यांनी भारतीय साहित्यात मोलाची भर घातली. भारतीय संस्कृती आणि समाजजीवनाचा अचूक वेध घेणारी, मर्मभेदी लेखनशैली त्यांची ओळख होती. यातून त्यांनी कादंबरी या साहित्यप्रकाराला वलय प्राप्त करून दिले. त्यांच्या कन्नड साहित्यकृतींची विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली. त्यांनी वीसहून अधिक कादंबऱ्या, अनेक निबंध, कथा, समीक्षाग्रंथांचे लेखन केले. त्यांच्या इंग्रजीतील पुस्तकांनाही वाचकांची पसंती मिळाली. वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि भारतीय साहित्यविश्वात आपल्या लेखन सौदर्यांने आगळ्या दृष्टिकोनाची भर घालणारे लेखक म्हणून भैरप्पा अजरामर ठरतील. त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्यकृती या पुढच्या पिढीसाठी संचित ठरतील. भैरप्पा यांचे शिक्षण क्षेत्रासाठीही भरीव योगदान राहिले. अशा या परखड, तत्वचिंतक, ज्येष्ठ साहित्यिकाच्या निधनाने साहित्य आणि तत्वचिंतन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वचरणी प्रार्थना. भैरप्पा यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *