खावडा प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा – वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. २६ : पालघर जिल्हयातील खावडा अतिउच्च दाब विद्युत वाहिन्यांच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या कामामध्ये प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना तुलनात्मकरित्या जास्त असलेला मोबदला देण्यात यावा. स्थानिक प्रशासन आणि संबधित कंपन्यांनी समन्वयाने प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील खावडा अतिउच्च दाब विद्युत वाहिन्यांच्या उभारणीतील दर निश्च‍िती व अन्य विषयांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावरा, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूमणी जाखड, दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षक पालघर यतिश देशमुख, रेझोनियाचे कार्यकारी संचालक निनाद पितळे, ‘महापारेषण’चे कार्यकारी अभियंता उल्हास ताकपिरे, महाप्रबंधक के.बी.सुब्रमण्यम, अदानी पावर, रेझोनिया, पावरग्रीड कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

वन मंत्री नाईक म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील खावडा अतिउच्चदाब विद्युतवाहिन्या उभारणीचे काम अदानी पावर, रेझोनिया, पावरग्रीड कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि., महापारेषण या कंपन्यांतर्फे सुरू आहे. जिल्हा प्रशासन व या कंपन्यांनी शेतकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून काम करावे. या प्रकल्पासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. शेतकऱ्यांना देय मोबदला मूल्यांकन तुलनात्मकरित्या जास्तीत जास्त देण्यासाठी प्रशासन व खासगी कंपन्यांनी प्राधान्य द्यावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून हा प्रश्न सोडवावा. या प्रकल्पाची कामे गतीने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नोडल अधिकारी नेमले असून पालघर जिल्हाधिकारी देखील हे काम गतीने करत आहेत. कामाची अशाच प्रकारे गती ठेवल्यास हे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होतील असेही मंत्री नाईक म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *