विधानसभा लक्षवेधी

अहिल्यानगर जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई, दि. १८ : राज्यातील पोलीस व्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकसंख्येनुसार सुसंगत बनवण्यासाठी राज्य शासनाने दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस ठाण्यांच्या स्थापनेसाठी नवीन निकष जारी केले. या निकषांनुसार प्रत्येक जिल्ह्याला पोलिसांकडील आकृतीबंध नव्याने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले.

सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नव्या निकषांमध्ये लोकसंख्येनुसार पोलीस ठाण्यांची गरज, दोन ठाण्यांमधील अंतर, शहरी व ग्रामीण भागातील ठाण्यांची रचना, आवश्यक विभाग व अधिकारी यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व जिल्ह्यांना नव्याने आकृतीबंध तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ५५० नवीन पदे मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000000

शैलजा पाटिल/विसंअ/

 

ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करण्याची केंद्राला विनंती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई, दि. १८ : ऑनलाइन गेमिंग बंद करण्यासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. ऑनलाइन लॉटरी व गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली आहे, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले.

सदस्य कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम  राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंग नियंत्रणासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी सभागृहाच्या माध्यमातून केले.

00000

शैलजा पाटिल/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *