गोंदिया जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत तात्काळ बैठक घेणार – मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. १७ : गोंदिया जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या रुग्णालयात ज्या सुविधा सध्या उपलब्ध नाहीत, त्या आरोग्यसुविधा तात्काळ उपलब्ध होणे व इतर अडचणींबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य राजकुमार बडोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयात सोनोग्राफी, डायलेसिस यंत्रणा व इतर वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्तघटक पुरवठ्याबाबतही तातडीने उपाययोजना केली जात आहे. गंगाबाई रक्तपेढी ही गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून, रक्तघटक वेगळे करणारे (सेपरेशन) यंत्र सध्या कार्यान्वित नाही. या मशीनसाठी आवश्यक असलेले लायसन्स सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन व राज्य शासनाच्या ‘एफडीए’ विभागाच्या संयुक्त तपासणीनंतर दिले जाते. ही तपासणी १ जुलै २०२५ रोजी होणार असून, त्यानंतर एका महिन्यात लायसन्स मिळेल.गोंदियामध्ये नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. यापुढे अधिष्ठाता यांच्याकडेच संपूर्ण कार्यभार असेल, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तो दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १७ : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येते. केंद्र शासनाचा निधी आला नसल्याने मधल्या काळात मानधन प्रलंबित राहिले होते. आता निधी प्राप्त झाला असून मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले
विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राज्य शासनाकडील मानधन नियमित देण्यात येते. केंद्र शासनाकडून जानेवारी २०२५ पासूनचा निधी येणे प्रलंबित होते. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत मानधन वितरित झाले नाही. दिनांक ४ जून २०२५ रोजी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन वितरण प्रक्रिया सुरू आहे. या मानधना संदर्भात आर्थिक तरतूद उपलब्ध आहे.
000
डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १७ : राज्यातील आरोग्य सेवांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलसोबतच निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफसाठी नियमित उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सेवेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीने करण्यात येत असून, गैरप्रकार आढळल्यास चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. माढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेगाव येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवास्थान इमारती जीर्ण झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानुसार या आरोग्य संस्थेचे बांधकाम पाडण्यास हरकत नसल्याबाबत विभागीय अधीक्षक अभियंता (सा.बां.वि.) यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन इमारत बांधकाम निर्लेखित करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. या आरोग्य संस्थेच्या जीर्ण इमारतींचे बांधकाम निर्लेखित करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000