‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी – मंत्री मंगल प्रभात लोढा

नाशिक, दि. ३०: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी काळानुरुप बदल स्वीकारत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी. त्याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करावे, अशा सूचना राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीण्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.

संत मीराबाई शासकीय मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज सकाळी मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, प्राचार्य दीपक बाविस्कार आदी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात बदल होत आहेत. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी न्यू एजवर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता करावी. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. याबरोबरच अहिल्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ ऑगस्टपासून अभ्यासक्रम सुरू होतील, असे नियोजन करावे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ज्या व्यक्तीचे नाव दिले आहे, अशा व्यक्तीच्या जयंतीसह विशेष दिनी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री लोढा यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण, इमारत बांधकाम, जिल्हा वार्षिक योजना आदींचा सविस्तर आढावा घेतला. सहसंचालक गावित यांनी विभागाची सविस्तर माहिती दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *