तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा – मंत्री गुलाबराव पाटील

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव, दि. २८ (जिमाका): “क्रीडा ही केवळ शारीरिक व्यायामाची बाब नसून ती शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचा विकास करणारी शाळा आहे. अमळनेर सारख्या ग्रामीण भागात अशा भव्य क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता होती. आज ती गरज पूर्ण होत आहे, ही बाब तालुकावासीयांसाठी समाधानाची आणि प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “सुदृढ आणि सशक्त युवक म्हणजेच सक्षम राष्ट्राची पायाभरणी आहे. हे संकुल नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि प्रोत्साहन देईल. याच माध्यमातून उद्याचे ऑलम्पिकपटू घडावेत, हीच अपेक्षा आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळांच्या माध्यमातून मनोबल, सहिष्णुता आणि संघभावना यांचा विकास होतो. शासनाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे,” असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

अमळनेर तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “गावा – गावातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती जर योग्य दिशेने वापरली तर गाव, राज्य आणि देशाचा विकास शक्य होतो. या संकुलामुळे ग्रामीण खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळतील आणि ते प्रेरित होतील, असा मला विश्वास आहे. सहकार चळवळ आणि क्रीडा संस्कृती ही दोन्ही ग्रामीण विकासासाठी पूरक आहेत,” असे मत त्यांनी मांडले.

आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील क्रीडा संस्कृतीसाठी हे नूतन संकुल फार उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करत आनंद दर्शविला.

या प्रसंगी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे स्केटिंग खेळाचे प्रात्यक्षिक

यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर स्केटिंगमध्ये विशेष प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकवर चित्तथरारक स्केटिंगचे दर्शन घडवले.

जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले की, या क्रीडा संकुलात कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योग, मार्शल आर्ट्ससाठी स्वतंत्र हॉल, ४०० मीटर धावपट्टी, बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग, ओपन जिम आदी सुविधा खेळाडूंकरीता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी आभार मानले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *