मुंबई, दि. १५ :- पारदर्शक प्रशासनासाठी आग्रही असे नेतृत्व आणि कुशल संघटक ज्येष्ठ नेते ग. दि. कुलथे यांच्या निधनामुळे शासन आणि अधिकारी-कर्मचारी संघटनेतील संवाद सेतू हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ग. दि. कुलथे यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न कौशल्याने सोडविले. पारदर्शक प्रशासनासाठी आग्रही असणारे कुलथे स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी होते. मात्र महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी अतिशय कणखर भूमिका घेतली. राजपत्रित अधिकारी महासंघाचे संघाचे प्रदीर्घकाळ नेतृत्व करताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांत पारदर्शकता, संवेदनशीलता, जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. “पगारात भागवा” सारखा अनोखा उपक्रम राबवला. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेऊन महासंघाच्या वतीने मदतीचा हात पुढे केला. ज्येष्ठ नेते कुलथे यांच्या निधनामुळे अधिकारी-कर्मचारी प्रिय नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
०००००