विधानपरिषद प्रश्नोत्तरे

औषधांच्या किमतीमध्ये तफावत आढळल्यास चौकशी करुन कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. 20 – पुणे शहरात प्रत्येक मेडिकलदुकानामध्ये एकच औषध वेगवेगळ्या कंपनीची उपलब्ध असून विविध मेडिकल दुकानात वेगवेगळ्या दराने मिळत असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही. मात्र अशी तफावत आढळून आल्यास त्याची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. सदस्य श्री.प्रवीण दरेकर यांनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, केंद्र शासनाच्या औषध किंमत नियंत्रण आदेश, 2013 अन्वये औषधांच्या किंमती नियंत्रित केल्या जातात. एमआरपी पेक्षा अधिक किंमतीत कुणीही औषध विक्री करू शकत नाही. त्यांना मिळणाऱ्या कमिशनमधून ते दर कमी जास्त करू शकतात. खाजगी रुग्णालयात जेनेरिक औषध दुकान सुरू करण्याबाबत निश्चित विचार केला जाईल, असे सांगून डॉक्टरांना जेनेरिक किंवा इतर ब्रँडचे औषध याबाबत स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही मंत्री श्री.झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

00000

बी. सी. झंवर/विसंअ

राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २० : राज्यात ३५८ तालुक्यांमध्ये १०० तालुका क्रीडा अधिकारी पदे मंजूर असून इतर तालुक्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे कार्यभार आहे. पद निर्मितीचा आणि आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाच्या पातळीवर विचाराधीन असून लवकरच तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अधिकारी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत सर्व संबंधित सदस्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल, असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अमोल मिटकरी यांनी तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, शिवाजीराव गर्जे, विक्रम काळे, कृपाल तुमाने, उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.भरणे म्हणाले, तालुका क्रीडा संकुल येथे सुविधा अपुऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तथापि लवकरच तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांमध्ये संरक्षण भिंत, इनडोअर हॉल, विद्युतीकरण, ड्रेनेज व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्रीडा साहित्य आदी सुविधा निर्मितीचे अंदाजपत्रक तयार केले जाईल तसेच राज्य क्रीडा विकास समितीसमोर मान्यतेसाठी ठेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी क्रीडा मंडळे चांगले काम करीत असतील तेथे क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्यांना देण्याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले. शासकीय इमारतींच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासंबंधीचा दर हा २०१४ सालचा आहे. हा दर बदलण्याची शिफारस करण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

बी.सी. झंवर/विसंअ/

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *