नवी दिल्ली, दि.11 : मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार असल्याची माहिती, पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री. पाटील यांनी सांगितले, राज्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस प्रथमतःच हरियाणा राज्यात असलेल्या पानिपत येथील शौर्य स्मारकाला 14 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात येणार आहेत.
14 जानेवारीला पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष 1761 मध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक युद्धातील वीरगती प्राप्त मराठ्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी 14 जानेवारीला पानिपत येथे शौर्य स्मारक दिन साजरा केला जातो. मागील 19 वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला यंदा राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यासह केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि राज्यातून इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
…असे असेल आयोजन!
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतील. यंदा ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक विशेषतः या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती आयोजकांनी सांगितले.
The post मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार first appeared on महासंवाद.