माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

शिर्डी, दि.७ – माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै.पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी कै.पिचड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, श्रीमती हेमलता पिचड, वैभव पिचड, हेमंत पिचड आदी उपस्थित होते.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना असल्याचे नमूद करून श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित, आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वन जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यतत्पर होते. राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी काम केले. निळवंडे धरणाचं २० किलोमीटरचे काम थांबले होते, तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले. या धरणामुळे शंभर किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आज पाणी मिळत आहे. भंडारदरा (निळवंडे) धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे जलाशय नाव देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती.  ते मितभाषी, व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते. विविध विषयाचा ज्ञान, व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने अतिव दुःख झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कै.मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर कै.मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, राजाभाऊ वाजे, आमदार नरहरी झिरवाळ, सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.

The post माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *