मुंबई, दि. १५ : पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी २३१-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदविल्यानंतर, त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती १८५ मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.
मलबार हिल मतदार संघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटर मधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे. सर्व मतदारांना मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी वापरण्यास पुर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद अवस्थेत केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते, अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली.
पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
००००
The post टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल first appeared on महासंवाद.