विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

निवडणूक आयोगाची छत्रपती संभाजीनगरला बैठक
जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा सादर

अमरावती, दि. ६ : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान यंत्र, निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, यंत्रणा यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिली.

निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर येथे अमरावती विभागातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. या बैठकीत श्रीमती पाण्डेय यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सामान्य निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया, बिधानचंद्र चौधरी, रवी राजन कुमार विक्रम, पोलीस निरीक्षक बत्तुला गंगाधर, खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ, डॉ. उमा माहेश्वरी आदी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहेत. त्यानुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात त्यांचे दुसरे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील दूर्गम भागातील मतदान केंद्राशी संपर्क साधण्याची सुविधा वनविभाग व पोलीसांच्या संपर्क यंत्रणांच्या सहाय्याने कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांना निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भेटी देऊन या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी करणार आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर ऑफिसर, पोलीस, होम गार्ड यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. 85 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदान दि. 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे, याची राजकीय पक्षांना माहिती आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. याचे दस्तावेज निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तयार करण्यात आले आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीपचे उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने शहरी भागात आणि लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी फिरते पथक, स्थिर पथक, खर्च पथक प्रभावीपणे कार्य करीत आहे.

०००

The post विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *