मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी

चंद्रपूर, दि. 14 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याची पडताडणी केली.

 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याबाबत नागरिकांना विचारून खात्री केली. यावेळी त्यांनी देवई गोविंदपूर येथील मतदान केंद्र क्रमांक 74, 75 आणि 42 या मतदान यादीतील समाविष्ट भागाला भेट दिली. तसेच शहरातील शास्त्रीनगर, बागला चौक या भागाला सुध्दा भेटी दिल्या.

यावेळी त्यांनी मतदार चिठ्ठ्या वाटपाची प्रगती, तसेच शिल्लक असलेल्या मतदार चिठ्ठ्या याबाबत संबंधित केंद्रस्तरीय अधिका-यांकडून सविस्तर आढावा घेतला. मतदार चिठ्ठ्या वाटपाचे काम वेळेत 100 टक्के पूर्ण होईल, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.  ज्या क्षेत्रात मतदार चिठ्ठ्यांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते.

याप्रसंगी मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंद्रपूर मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले यांच्यासह पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *