मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले.
भायखळा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात क्षेत्रिय अधिकारी (झोनल ऑफिसर) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी श्री. यादव यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
श्री.यादव म्हणाले, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व क्षेत्रिय अधिकारी यांच्या कामात एकसूत्रीपणा राहावा यासाठी प्रशिक्षण आवश्यक असून सर्व अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण लक्षपूर्वक घ्यावे. तसेच या प्रशिक्षणातून मतदान केंद्रावरील सर्व निवडणूक प्रक्रियेची माहिती समजून घेऊन त्याचा सूक्ष्मपणे अभ्यास करावा, अशा सूचना श्री.यादव यांनी यावेळी दिल्या.
ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणाबाबत सविस्तर माहिती घेऊन निवडणुकीचे महत्व समजून प्रत्येकाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले साहित्याचे वाचन करून प्रत्येक बाबीची सूक्ष्म माहिती घ्यावी, अशा सूचना श्री.यादव यांनी यावेळी दिल्या.
लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेमध्ये थेटपणे सहभागी होऊन आपली कर्तव्यभावना व लोकशाहीप्रती असणारी निष्ठा अधोरेखित करत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, असे गौरवोद्गार श्री. यादव यांनी यावेळी काढले.
त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे. जेणेकरून आपले मतदानाविषयी कर्तव्य अधिकाधिक योग्य प्रकारे पार पाडता येईल,असेही श्री. यादव यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना आवर्जून नमूद केले.
या संवादादरम्यान, जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले की, आपल्यापैकी काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही निवडणूक कार्यात सहभाग नोंदविला असेल, तर काही कर्मचाऱ्यांची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, सर्वांनीच ही त्यांची पहिलीच निवडणूक ड्युटी’ आहे, असे समजून प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात येणाऱ्या सर्व बाबी व सूचना अत्यंत लक्षपूर्वक समजावून घ्याव्यात व त्याबाबी काम करताना काटेकोरपणे अंमलात आणाव्यात.
यावेळी नोडल ऑफिसर (प्रशिक्षण) अजित देशमुख यांनी उपस्थित सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व बाबींची अत्यंत सविस्तर व प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण दिले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ
The post क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आदेश, सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी संजय यादव first appeared on महासंवाद.