मुंबई, दि. १८ : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करून मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात यावा. निवडणूक हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात मतदारांनी सहभागी होण्यासाठी मतदारांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने मतदान केंद्रनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे निर्देश मुंबई शहर जिल्हा जिल्हाधिकारी तथा अति. निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व विभागाचे समन्वय अधिकारी, सहायक समन्वय अधिकारी उपस्थित होते.
श्री.यादव म्हणाले, मे महिन्यात तापमान अधिक असल्याने निवडणुकीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष देऊन कमी मतदान का झाले याचा अभ्यास करून निरंतरपणे मतदार जागृतीसाठी SVEEP (सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती करावी, यामध्ये शाळा, महाविद्यालय यांच्यासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, अशा सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्यात याव्यात, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी वेटिंग व्यवस्था, खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी, पंखे या सुविधा उपलब्ध करून मतदारांना फार काळ रांगांमध्ये उभे राहावे लागणार नाही, आणि गर्दी होणार नाही यासाठी टोकन सिस्टीम, कलर कोड अशी व्यवस्था करण्यात यावी. याच बरोबर आरोग्य सुविधा सुद्धा पुरविण्यात याव्यात, असेही श्री.यादव यांनी यावेळी सांगितले.
मतदानाच्या दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक आहे. याबाबत खासगी संस्था,औद्योगिक संस्था, हॉटेल असोसिएशन यांच्या सोबत चर्चा करावी. तसेच जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे तसेच उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र आणि सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील मतदान केंद्रावरील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे करावी असेही बैठकीत सांगितले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. दिव्यांग आणि ८५ वर्षे वयाच्या नागरिकांना घरून मतदानाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना टपाली मतपत्रिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
नागरिकांकडून मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे सद्य:स्थितीत नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात यावी. तसेच नाव नोंदणीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे. अर्जाबाबत शंका असल्यास बीएलओमार्फत स्थळ पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.
मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती याबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.
000
The post विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश first appeared on महासंवाद.