नाशिक, दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : नागरिकांच्या मूलभुत गरजा लक्षात घेवून आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज देवळाली मतदार संघातील सय्यद प्रिंपी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी आमदार आमदार सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, सरपंच भाऊसाहेब ढिकले माजी यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण, शहरी व कॅन्टोमेंट अशा तीन भागात विभागलेला आहे. या तीनही भागातील रस्ते, आरोग्य सेवा व आवश्यक विकासकामांसाठी गेल्या अडीज वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. नाशिकरोड येथे दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. या न्यायालयाच्या उभारणीतून नागरिकांची सोय होणार असून वेळ वाचणार आहे. 1 हजार 500 कोटी रूपयांच्या नदीजोड प्रकल्पासही मान्यता मिळाली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळणार आहे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या रस्त्यांचे क्राँकीटीकरण कामांचे आज भूमिपूजन झाले असून आवश्यक निधीही यासाठी मंजूर झाला आहे. या रस्त्यांचे दर्जेदार काम दिड वर्षाच्या कालावधीत पूर्ण केले जाणार आहे. यासह आवश्यक ठिकाणी पाणंद रस्त्यांचे कामेही केली जाणार आहे. येणा-या काळात एकलहरे येथील विद्युत संच दुरूस्ती तसेच संत श्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज 660 कोटींच्या आरखडा प्रस्तावास मंजूरी देण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले सर्व घटकांच्या विकासाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. 44 लाख शेतकऱ्यांचे 15 हजार कोटी रूपयांचे वीज बिल शासनाने भरून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे. 1 ऑक्टोबर पासून गाईच्या दुधाला रूपये 35 हमीभाव देण्यात आला आहे. शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे ४६ हजार कोटी रुपयांचा निधीचा २ कोटी चाळीस लाख महिलांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन निर्यातबंदी उठवली. येणाऱ्या काळात सौर वीज पंपाच्या माध्यामातून शेतकऱ्यांना दिवसा सौर वीज उपलब्धेतचा पर्याय उपलब्ध होणार असून याद्वारे 91 हजार 500 मेगावॅट वीज शेतक-यांना उपलब्ध होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालय 34 कोटी निधीतून साकारले जाणार असून या रूग्णालयांच्या माध्यमातून नाशिक-पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातातील रूग्णांना वेळेत प्राथमिक उपचार मिळणार आहेत. देवळाली कॅन्टोमेंट बोर्डालाही यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रूपये 5 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून लॅमरोड, देवळाली शहर या भागात रस्त्यांच्या कामांसह विविध कामे करणे शक्य झाले आहे. तसेच भगूर येथील स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासाठी रूपये 40 कोटींच्या निधीस मान्यता प्राप्त झाला असल्याचे आमदार सरोज आहेर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी आमदार माणिकराव कोकाटे व सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कामांचे झाले भूमिपूजन
• राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या रस्त्यांचे क्राँकीटीकरण (मंजूर निधी रक्कम रूपये 172.89 कोटी)
• मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम करणे (मंजूर निधी रक्कम रूपये 34.51 कोटी)
• देवळाली मतदार संघातील 122 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
000000
The post लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य : उपमुख्यमंत्री अजित पवार first appeared on महासंवाद.