मुंबई, दि. १० : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्ररथाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या जीवनकार्यावर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून राज्यात सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यांपुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाचे भव्य सादरीकरण होणार आहे.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच स्थानिक खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
The post महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार first appeared on महासंवाद.