येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागासाठी वरदान ठरेल ममदापूर बंधारा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.  ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : ममदापूर येथे प्रस्तावित बंधारा येवला तालुक्यातील उत्तर – पूर्व भागासाठी उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प वन्यजीवांची तहान भागविणाराही ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मृद व जलसंधारण विभागातर्फे ममदापूर, ता. येवला (मेळाचा बंधारा) येथे १५ कोटी ७४ लाख रुपये खर्चातून साठवण तलाव बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज दुपारी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ममदापूरच्या सरपंच विठाबाई सदगीर, मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गीते, तहसीलदार आबा महाजन आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. हा प्रकल्प ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असून वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार असल्याने राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्या घेण्यात आल्या आहेत. राज्य वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव मंडळ स्थायी समिती, केंद्र शासनाचा वने आणि पर्यावरण विभाग आदी विभागासह विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाने पाठपुरावा केला.

केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. त्यानंतर जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रदान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. या समितीने ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील या साठवण तलावाच्या स्टेज- १ जमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम वर्षभरात पूर्ण करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

येवला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. येवला येथे चार एकर क्षेत्रात शिव सृष्टी साकारण्यात आली आहे. तेथे नागरिकांची वर्दळ वाढली आहे. या स्मारकापासून नागरिकांना प्रेरणा मिळेल, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. श्री. गीते यांनी सांगितले की, वन विभागाची २८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. वन आणि वन्य जीव विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. या तलावाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.

ममदापूर साठवण तलावाची माहिती

जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. समितीने २० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडून स्टेज -2 ला अंतिम मंजुरी दिली आहे. या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ दशलक्ष  घनफूट इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर, तर सांडव्याची लांबी ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे.

रस्त्याचे भूमिपूजन

तत्पूर्वी मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते ममदापूर ते लंबे वस्ती या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री ग्राम सडक (टप्पा दोन) योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होणार आहे.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *