‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो ३ च्या पहिल्‍या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई दि. 5:  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन 3, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या च्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या वाहतुकीला गती देणाऱ्या मेट्रो 3 च्या पहिला टप्प्याचे लोकार्पण झाले.तसेच मुंबई व ठाणे परिसरातील 32 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी बांद्रा-कुर्ला संकुल येथील मेट्रो स्टेशन येथे पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी बीकेसी ते सांताक्रुज असा मेट्रो प्रवास केला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी प्रवासादरम्यान मेट्रोमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी भगिनी आणि विद्यार्थी, मजूर यांच्याशी संवाद साधला.

यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो कनेक्ट- 3 या मेट्रो सेवेच्या ‘मोबाइल ॲप’चे ही लोकार्पण करण्यात आले. हे ॲप नवीन वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त असणार आहे. याचबरोबर मेट्रो 3 प्रकल्पावर आधारित ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरणही प्रधानमंत्री श्री. मोदी  हस्ते करण्यात आले. यामध्ये भूमिगत मेट्रो प्रवासाच्या नेत्रदीपक फोटोंचा संग्रह आहे. मेट्रो 3 (आरे- बिकेसी) हा मार्ग रविवार दि.5ऑक्टोबर 2024 रोजीपासून सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

मेट्रो 3 च्या पाहिल्या टप्प्याचे वैशिष्ट

हा प्रकल्प आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला- कॉम्लेक्स असा 12.69किलोमीटरचा आहे. यामध्ये एकूण 10 स्थानके (9 भूमिगत व एक 1 जमीन स्तरावरील स्थानक) असणार आहेत. याचा प्रकल्प खर्च (टप्पा-1)-  ₹14120 कोटी इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *