कल्याणकारी महामंडळे ही मच्छिमारांच्या उन्नतीची सुरुवात – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ४ : नव्याने स्थापन होत असलेली दोन मच्छिमार कल्याणकारी महामंडळे ही मच्छिमारांच्या सर्वांगीण उन्नतीची सुरुवात आहे, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. “सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ” आणि “भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ” अशा दोन नवीन महामंडळांच्या स्थापनेस आज राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून, या वेगवान आणि संवेदनशील निर्णयाबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. या दोन महामंडळांच्या स्थापनेचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असून विविध मच्छिमार संघटनांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

या नवीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळांबद्दल बोलतांना मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की,  मत्स्यव्यवसाय हे रोजगार देणारे एक मोठे क्षेत्र आहे आणि या क्षेत्राकडे केंद्र सरकारनेही अधिक लक्ष पुरवले आहे. राज्यातील 720 कि.मी.ची सागरी किनारपट्टी, राज्यभर पसरलेले हजारो तलाव, विदर्भातील हजारो मालगुजारी तलाव, धरणांचे तलाव यांनी राज्य समृद्ध आहे. त्यामुळे भूजल आणि सागरी मासेमारी दोन्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतात. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह मत्स्यव्यवसायावर चालतो. मासे म्हणजेच प्रथिनयुक्त आहाराचा पुरवठा मच्छिमार बांधव हे समाजाला करीत असतो. राज्याच्या खाद्य संस्कृतीसोबतच सामाजिक संस्कृतीही मच्छिमार बांधव समृद्ध करतात. मच्छिमार बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. वादळ त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छिमार बांधवांचे अतोनात नुकसान होत असते. नावांचे व जाळ्यांचे, इतर उपकरणांचे नुकसान आर्थिक संदर्भातही मोठे असते. तसेच जीवावरही बेतू शकते.

मंत्री श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, मच्छिमार बांधवांना सोयी सुविधा, प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, विमा संरक्षण, नवीन तंत्रज्ञान, पतपुरवठा अशा सर्व क्षेत्रात मच्छिमार बांधवांच्या समस्या सोडविण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांवर व मागण्यांवर यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. मात्र मच्छिमार बांधवांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्वांगीण कल्याण साधण्यासाठी महामंडळ असले पाहिजे, असे आम्हाला वाटले. याला शासनाने तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत दोन महामंडळे निर्माण करण्यास मंजुरी दिली. राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राकरता हा ऐतिहासिक क्षण आहे, असेही ते म्हणाले.

मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, आता या महामंडळांच्या माध्यमातून मच्छिमार बांधवांकरिता कल्याणकारी योजना वेगाने राबवता येतील. भूजलाशयीन आणि सागरी मच्छिमारीचे प्रश्न वेगळे असल्याने दोन वेगळी महामंडळे निर्माण केली आहेत. मच्छिमार कुटुंबे आता उन्नतीकडे वाटचाल करू लागतील, असे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *