माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली

धुळे, ‍दि. २८ (जिमाका):  माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री आमदार सर्वश्री. बाळासाहेब थोरात, ॲड. के.सी. पाडवी, जयकुमार रावल, सत्यजित तांबे,  हिरामण खोसकर, शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, तहसीलदार पंकज पवार, अरुण शेवाळे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार डॉ. सुभाष  भामरे यांच्यासह आजी माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, आप्तेष्ट, नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रध्दांजलीपर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना दिली. यावेळी  मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी घेतले अंत्यदर्शन

प्रारंभी,  ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *