राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. आगामी काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर असून लवकरच विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी आहे. या दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळचा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ केला. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला आहे. लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी मर्यादित असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महामंडळाने या ठिकाणी 4 हजार 13.23 चौमी एवढ्या जागेत अद्ययावत असे पर्यटक निवासाचे बांधकाम केले आहे. 20 खोल्या, 2 डॉरमेट्री, 1 उपहारगृह, 1 किचन, स्वागतकक्ष इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. पर्यटक निवास बांधण्याकरिता 7 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. सर्व खोल्या या वातानुकुलित असुन भव्य असे  2 लोकनिवास महीला आणि पुरुषांसाठी तयार करण्यात आले आहेत. भांडारकक्ष, स्वच्छतागृह, अपंगांसाठी स्वच्छतागृह, स्वागतकक्ष, व्यवस्थापक कक्ष याचाही यामध्ये समावेश आहे.

पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या की, राष्ट्रकुट पर्यटक निवासामुळे वेरुळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या आणि घृष्णेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उत्तम दर्जाची सोय होणार आहे. येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही लेण्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी उपलब्ध होणार असून छत्रपती संभाजीनगर शहरापासुन वेरुळ जवळच असल्याने पर्यटक या ठिकाणी राहण्यास जास्त पसंती देतील.

व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की, पर्यटक निवासाच्या समोरच हेलीपॅड असून जवळच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्रही आहे. पर्यटक निवासामध्ये विविध सोयी असल्याने पर्यटकांना राहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसचे सदरचे पर्यटक निवास हे वेरुळ लेण्यांच्या अगदी समोरील बाजुस असल्याने पर्यटकांना निवासाच्या खोल्यांमधून आणि छतावरुन लेण्यांचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.

राष्ट्रकुट पर्यटक निवासाचे व्यवस्थापन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक हरणे हे करीत आहेत.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *