मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.२६ :- शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते आज बोलत होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मुंबई, कोल्हापूर प्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा 150 एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करणार असून मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करणार आहे. राज्यात 75 नवीन चित्रनाट्य गृहे बनविण्यात येणार आहेत. तसेच नरिमन पाँईट येथे मराठी चित्रपटगृहे उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दादासाहेव फाळके चित्रनगरीच्या 47व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाने आजच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले. अ, ब आणि क या तीन श्रेणीत मोडणाऱ्या दर्जेदार चित्रपटाना हे अर्थसहाय्य  देण्यात आले. या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, निर्मात्यांना जिथे चित्रीकरण करायचे आहे तिथे त्यांना नि:शुल्क चित्रीकरण करता येणार आहे. दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची सुरुवात केली, रजनीकांत यांनी आपल्या अभिनयच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहेनत घेतलेली असते, पण कधी यश मिळते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते, मात्र त्यामुळे खचून जायचे नसते. दर्जेदार चित्रपट निर्मात्यांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी हा प्रयत्न आहे. हा फक्त धनादेश नाही तर महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच्या या शुभेच्छा आहेत. दक्षिणात्य भाषेचे चित्रपट हा मराठीमध्ये डबिंग करून दाखवले जातात तसे भविष्यात मराठी चित्रपट दक्षिणात्य व अन्य भाषेमध्ये डबिंग करून दाखवले गेले पाहिजेत. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीने सातासमुद्रापार जात जागतिक झेप घ्यावी अशी सर्व मराठी जनतेची अपेक्षा आहे. कारण भारतीय चित्रपटसृष्टीचा संस्थापकच मराठी होता आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहुर्तमेठ या महाराष्ट्रातच रोवली गेली होती. म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे.

यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले की, मराठी चित्रपट आता भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही. सध्या सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. चित्रपट सृष्टीपुढे एयआयचे मोठे आव्हान आहे. एयआयच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीने संपूर्ण देशात आणि देशाबाहेर जावे. मराठी चित्रपट अधिकाधिक दर्जेदार कसा होईल आणि फक्त महाराष्ट्रा पुरताच मर्यादित न राहता तो साता समुद्रापलीकडे कसा जाईल याकडे लक्ष द्यायला हवे, असेही ते म्हणाले. जीडीपीमध्ये मनोरंजन क्षेत्राचा ३ % वाटा आहे.

यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तसेच ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या पहिल्या महिला दिग्दर्शकांना प्रति पाच लाख रुपये धनादेशचे वितरण करण्यात आले. ‘तिचं शहर होणे’, या चित्रपटासाठी रसिका आगाशे, येरे येरे पावसासाठी शफक खान, बटरफ्लायसाठी मीरा वेलणकर, गिरकी या चित्रपटासाठी कविता दातीर यासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘वाळवी’ चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्यात आले. या कार्यक्रमात 77 ‘अ’ व ‘ब’ वर्ग दर्जाच्या व तसेच प्रथमच समावेश केलेल्या ‘क’ वर्गाच्या 21 चित्रपट निर्मात्यांना 29 कोटी 22 लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.

******

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *