सेना दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

मुंबई, दि. २६ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५८ आयोजित करण्यात आला आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासह निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-५८ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणार्थी कंम्बाईड डिफेन्स सहींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेले असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. प्रशिक्षणार्थी एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्याकडे एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी प्रशिक्षणार्थीकडे एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *