उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

मुंबई, दि. १८:  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने  मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे १५०० रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये, धर्मादाय संस्था, मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि  लोक सहभागातून हे आरोग्य शिबिरे पार पडणार आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर २५ हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे ध्येय निर्धारीत केले आहे. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत या शिबिर सुरू असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसोबतच ५९ प्रकारच्या रक्त चाचण्या, इ.सी.जी. यासारख्या तपासण्याही केल्या जाणार असून आवश्यक औषधांचे वाटप केले जाणार आहे.  त्यासोबतच आयुष्मान भारत योजना- ‘आभा कार्ड’चे वितरण करण्यात येणार आहे.  रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत ‘राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष’ समन्वय साधणार आहे.  या कक्षाच्या माध्यमातून  वैद्यकीय सहाय्याचा आलेख दिवसें-दिवस चढता राहिला आहे. अवघ्या ८ महिन्यांत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना १३ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली गेली.

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हृदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपणसारख्या  गंभीर व सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेरील आजारांवर धर्मादाय रुग्णांलयात उपचार होत आहेत. निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी विशेष वैद्यकीय मदत कक्ष तत्परपणे कार्य करत आहे.

प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचारासाठी  आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोफत व सवलतीच्या दरात जास्तीत जास्त गरजुंना उपचार घेता यावेत यासाठी आपण वार्षिक उत्पन्न मर्यादा देखील वाढवली आहे. निर्धनांसाठी ती १ लाख ८० हजार रुपये तर दुर्बल घटकांसाठी ३ लाख ६० हजार रुपये एवढी वाढवली आहे. त्यामुळे कुणीही निर्धन व दुर्बल घटकातील रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही.

मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवण्याकरिता अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ०२२- २२०२००४५ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत कार्यरत वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *