मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान अमूल्य – पालकमंत्री अब्दुल सत्तार

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

• अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल
• महत्वपूर्ण योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न
• अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या व या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 45 हजार 920 पात्र लाभार्थ्यांना 2 कोटी 53 लाख रुपये अनुदान स्वरुपात बचत खात्यामध्ये जमा

हिंगोली (जिमाका), दि. 17 : स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पुर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला. या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कै. अण्णासाहेब टाकळगव्हाणकर उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी  श्री. सत्तार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती रुक्मिणीबाई देवकते, श्रीमती मालती पैठणकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाडा मुक्त केला. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. महाराष्ट्र शासन स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि जनतेच्या याच त्यागाबद्दल कृतज्ञ राहून कार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुलींना शिक्षणात 50 ऐवजी 100 टक्के शुल्कमाफी योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना यांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 05 हजार 499 बहिणींची नावनोंदणी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 98 हजार 118 बहिणी पात्र ठरल्या आहेत. या योजनेतून हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार 219 पात्र लाडक्या बहिणींना दोन महिन्याची रक्कम 44 कोटी 76 लाख 57 हजार रुपये डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. तसेच उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्त्यांचे 3 हजार रुपये जमा झाले असल्याने याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून लाडक्या बहिणींच्या नावनोंदणीला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगितले.

तसेच युवक-युवतींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत  आतापर्यंत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना 6 महिने शासकीय कार्यालयात कामाचा अनुभव आणि त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6 हजार, 8 हजार किंवा 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 859 युवक-युवतींना नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून 1 हजार 846 युवक-युवतींनी प्रत्यक्षात रुजू होऊन कार्य प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाल्याचा आनंद आहे. धार्मिक अधिष्ठान असलेल्या आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. देशातील विविध धार्मिक स्थळे ज्येष्ठ नागरिकांना याची देही याची डोळा पाहता यावीत, त्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली आहे. हे ज्येष्ठ नागरिक या योजनेत पात्र ठरावेत, प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने आरोग्य तपासणी शिबिरही घेतले. यामध्ये जिल्ह्यातील किमान 1 हजार लाभार्थ्यांना तीर्थदर्शनासाठी 30 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.

ज्यातील एकही व्यक्ती सणसुदीला आणि एरव्हीही उपाशीपोटी झोपू नये, त्यासाठी आवश्यक असणारा आनंदाचा शिधा आणि मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या माध्यमातून तो शिजवण्यासाठी त्या मायमाऊलीला वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 84 हजार इतक्या माता-भगीनी या योजनेच्या लाभार्थी असून, त्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला आणि मुख्यमंत्री अन्नपुर्णा  योजनेतून सिलेंडर मिळत आहेत. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपयांपर्यंत साहित्य खरेदीसाठी त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील किमान 20 हजार ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे, असल्याचे पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून 236 गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात 80 हजार शेतकऱ्यांपैकी 40 हजार शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात लाभाचे वितरीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्ते बांधणीला प्राधान्य देण्यात आले असून, 2015-16 ते 2023-24 या सात वर्षांमध्ये 850 किमी लांबीचे 249 रस्ते मंजूर झाल आहेत. त्यापैकी आतापर्यंत 227 कामे पूर्ण झाली असून, 20 कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला.

याशिवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि मा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे ब्रँडींग आणि विपणन करण्यासाठी, उद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नुकतीच वसमत तालुक्यातील पार्डी बुद्रक येथील 40 हेक्टरवर औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना कृषी विज बिल भरण्याची गरज राहणार नसल्याचेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 लाख 86 हजार 144 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर 2 हजार 153 घराची अंशत: पडझड झाली आहे. याचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात असून आतापर्यंत 98 टक्के काम झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या अतिवृष्टीमध्ये 2 व्यक्ती मयत झाले असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 213 पशुधनाचे मयत झाले असून त्यांनाही तालुकास्तरावर सानुग्रह अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिली.

वित्तीय संस्थांकडून 3 लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या व या कर्जाची प्रति वर्षी दि. 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 3 टक्के दराने व्याज सवलत अनुज्ञेय आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये व्याज सवलत योजनेच्या 45 हजार 920 पात्र लाभार्थ्यांना 2 कोटी 53 लाख रुपये अनुदान स्वरुपात त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागास मुस्कान कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरचे मानांकन मिळाले आहे. ही अभिनंदनाची बाब आहे. जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, सिमेंट रोड व शेड, हृदयरुग्ण असणाऱ्या लाभार्थ्यासाठी कार्डियाक कॅथेटेरायझेशन प्रयोगशाळा, सहा मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे बांधकाम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती श्री. सत्तार यांनी दिली.

अनुसूचित जाती उपयोजनेतून समाजातील दुर्बल, वंचित घटकाला समान न्याय व समान हक्क या भूमिकेतून त्यांना उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी शासनाने विशेष घटक योजना 1980 पासून सुरु केली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये 18 विविध विभागांमार्फत 59 योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरु करण्यात आली आहेत. त्यांच्यासाठी विविध शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेतून आतापर्यंत 84 जणांना लाभ दिला आहे. तसेच मिनी ट्रॅक्टर, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाही राबविण्यात येत असल्याची माहिती श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.

प्रारंभी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी श्री. सत्तार यांनी  स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय रुक्मिनीबाई देवकते, मालतीबाई पैठणकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच श्री. सत्तार यांनी  लोकप्रतिनिधी,  अधिकारी,   पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांना आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून मोलाची कामगिरी बजावणाऱ्या बाबाराव रामरावजी पडोळे यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियाना’चा जिल्ह्यात प्रारंभ

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम दि. 17 सप्टेंबर ते दि.1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आला.

यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी  स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे.  त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध दैनंदिन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ गाव, तालुका व जिल्हास्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबीर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबविण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. यावेळी पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *