मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

 लातूर, दि. १७ : मराठवाड्याच्या भूमीला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी लढल्या गेलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या प्रेरणादायी इतिहासाला साक्षी ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प्रारंभी हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे व मान्यवरांच्या हस्ते  मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. उपस्थितांसह जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठवाडा ही संत-महंतांची, बुद्धिवंतांची भूमी आहे. तशीच त्यागाची, समर्पणाची व बलिदानाचीही भूमी असून या भूमीला धैर्याचा, शौर्याचा व संघर्षाचा प्रगल्भ ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी त्यानंतरही १३ महीने अर्थात १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत संघर्ष करावा लागला. मराठवाड्याला निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठे आंदोलन छेडले गेले. या आंदोलनात थोर स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे, डॉ. देवीसिंह चौहान यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यवीर आणि लातूरकरांचे अमूल्य योगदान आहे, हे आपणास विसरून चालणार नाही, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

गाव-वस्तीतील जनतेने मराठवाडा मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला. औराद, निलंगा, हाडोळी, बोटकुल, हत्तीबेट, रामघाट, अंबुलगा, तोंडचीर आणि घोणसी अशा अनेक ठिकाणी रझाकार व निजाम सैन्यांच्या विरोधात लढाया झाल्या. सर्वसामान्य जनतेने निजामाच्या सैन्याशी धैर्याने लढा दिला. मराठवाडा मुक्तिसंग्रामात महिलांनीही महत्त्वाचे योगदान दिल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या प्रेरणादायी इतिहासाच्या साक्षीने जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने लोकांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी काही नव्या योजना सुरू केल्या आहेत. महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. यासोबतच महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ दिला जात आहे. युवकांमध्ये नोकरी मिळविण्याचे कौशल्य वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

लातूर जिल्ह्यात वन क्षेत्र अतिशय कमी आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान सुरु केले आहे. जून महिन्यापासून सुरु असलेल्या या अभियानामध्ये आतापर्यंत जवळपास 33 लाखपेक्षा अधिक वृक्ष लागवड झाली आहे. जिल्ह्यात ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान राबविले जात आहे. यामध्ये प्रत्येकाने आपल्या आईसोबत किंवा आईला अभिवादन म्हणून किमान एक झाड लावावे, ही संकल्पना आहे. या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, किमान एक तरी झाड लावावे आणि आपला जिल्हा हरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.

जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सभामंडपात उपस्थितीत स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *