पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘मोबाईल मेडिकल क्लिनिक’चे लोकार्पण

फिरत्या मेडिकल क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच उपचार सुविधा उपलब्ध होईल – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

अमरावती, दि. 16 : मोबाईल मेडिकल क्लिनिकच्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधीर विद्यालयाला सदिच्छा भेटप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

यावेळी आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे पदाधिकारी यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, मेळघाटातील अतिदुर्गम गावात रस्ते सुविधा कमी असल्याने प्राथमिक औषधोपचारासह इतर वैद्यकीय उपचार सुविधा घेण्यासाठी खूप अडचणी येतात. वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी दूर अंतरावरच्या आरोग्य केंद्रात जावे लागते. फिरते मेडिकल क्लिनिकमुळे आजारी व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचणे शक्य होऊन वेळेत संबंधित रुग्णाला उपचार सुविधा देता येईल, असे त्यांनी सांगितले. ही फिरते मेडिकल युनिट असलेली अँम्ब्युलन्स मेळघाटातील 25 गावात वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. या मोबाईल मेडिकल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय, रक्त चाचण्या उपलब्ध आहेत, अशी माहिती बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधीर विद्यालयाला येथे सदिच्छा भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *