जिल्ह्यासह देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे काम ग्रंथालयाने करावे – मंत्री धनंजय मुंडे

जिल्हा शासकीय ग्रंथालये इमारतीचे भूमिपूजन

बीड, दि. १५ (जिमाका): जिल्ह्यातील प्रत्येकासाठी अविरत काम करणारे ग्रंथालय उभारा त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला यातील ग्रंथाचा लाभ मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जिल्ह्यासह देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे काम ग्रंथालयांनी करावे, असेही ते म्हणाले.

येथील जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. येथील सर्व्हे क्र. 34 सहयोगनगर, जालना रोड येथे 4 कोटी 86 लाख रुपये खर्च करून ही इमारत उभारली जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषद प्रशासक संगीतादेवी पाटील, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या ग्रंथालयात पुस्तकांसह डिजिटल पद्धतीने ग्रंथसंपदा उपलब्ध राहणार आहे व अशा स्वरूपाचे राज्यातील चौथे डिजिटल ग्रंथालय आहे.

या ठिकाणी प्रशस्त अशी इमारत उभारण्यात येत आहे. येथे कार्यालयासोबतच एक सभागृह तसेच स्पर्धा परीक्षाकक्ष याचेही नियोजन आहे. सध्या जिल्हा ग्रंथालयाकडे 47 हजार पुस्तके उपलब्ध आहेत. उपलब्ध होणारे इमारतीमधील जागेच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे.  त्यामुळे येथे अधिक ग्रंथ खरेदी करून वाचकांना उपलब्ध करून द्या, असे सांगून मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, यासाठी जिल्हा विकास निधी तसेच राज्य सरकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना इथे सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असावीत, अशी अपेक्षा आहे. संदर्भ ग्रंथाची उपलब्धता आणि पुस्तके एखाद्या ॲप्लिकेशनद्वारे मोबाईल उपलब्ध करून देण्याचे कामे ग्रंथालयांनी करावे, असे ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी परळी  वैद्यनाथ येथील भालचंद्र वाचनालयाचा आवर्जून उल्लेख केला.

ग्रंथालयाची जिल्ह्यातील एकूण संख्या 650 हून अधिक आहे. त्यांचे अनुदान तसेच  इतर प्रशासनिक बाबी काही प्रमाणात प्रलंबित आहेत. यावर येत्या काळात सर्वांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अशोक गाडेकर (ग्रंथालय संचालक) यांनी प्रास्ताविक केले. सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी सूत्रसंचालन केले तर पुरुषोत्तम राऊत यांनी आभार मानले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *